Tuesday, 26 April 2011

आधार'च्या नोंदणीधारकाला शंभर रुपये मिळणार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, April 26, 2011 AT 12:15 AM (IST)

भिवंडी -  देशातील सर्व नागरिकांना विशिष्ट ओळख क्रमांक देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या "आधार' प्रकल्पाला उत्तम प्रतिसाद मिळावा, यासाठी भिवंडी महापालिकेने अनोखी शक्‍कल लढवली आहे. शहरात ही योजना यशस्वी करण्यासाठी दारिद्य्ररेषेखालील कुटुंबातील नोंदणीधारकांना प्रत्येकी 100 रुपये, तर सर्वसाधारण नोंदणीधारकांना प्रत्येकी 50 रुपये देण्याचा निर्णय पालिकेने घेतल्याची माहिती भिवंडी पालिका आयुक्‍त अच्युत डांगे यांनी सोमवारी दिली.

देशातील रहिवाशांना विशिष्ट ओळख क्रमांक देण्यासाठी केंद्राने भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाची स्थापना केली आहे. येथील स्व. मीनाताई ठाकरे रंगायतनमध्ये महापौर यशश्री कडू, डांगे, आमदार रशिद ताहीर मोमीन, पालिकेचे सभागृह नेते सिद्धेश्‍वर कामूर्ती यांचे संगणकावर छायाचित्र, हाताचे ठसे आणि डोळ्याच्या बुब्बुळांचे छायाचित्र घेऊन या प्रकल्पाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी डांगे यांनी ही घोषणा केली. भिवंडीमध्ये रहिवाशांचे छायाचित्र आणि हातांचे ठसे घेण्याचे काम पालिकेने "महा ऑनलाईन प्रा. लि.' वर सोपवले आहे. हे ओळखपत्र मिळविण्यासाठी संस्थेचा अर्ज भरून बॅंकेचे पासबूक, वीज बिल, मतदार ओळखपत्र, शिधापत्रिका आदी कागदपत्रे पुराव्यादाखल सादर करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. यात नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी नोंदणीधारकांना मानधन देण्याचा निर्णयही पालिकेने घेतला असून, भिवंडीवासीयांनी त्याचे स्वागत केले आहे. दरम्यान, या योजनेमुळे नागरिकांना विविध योजनांचा लाभ उठवता येणार आहे. या क्रमांकामुळे व्यक्‍तीला देशात कुठेही बॅंकेत खाते उघडणे अथवा अन्य सरकारी कामे करताना निर्माण होणारे अडथळे दूर होणार आहेत. त्यामुळे याचा लाभ उठविण्याचे आवाहन यशश्री कडू आणि मोमीन यांनी शहरवासीयांना केले आहे.

No comments:

Post a Comment